बुलढाणा, दि. २ : राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा सामान्य जनतेला एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ व मदत वितरणाचा कार्यक्रम उद्या रविवार, दि. ३ रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे संपूर्ण तयारी झाली आहे. अमरावती विभागात प्रथमच हा कार्यक्रम होत असून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी याठिकाणी सर्व अनुषंगिक सोयी-सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.
विभागीय आयुक्तांनी आज प्रत्यक्ष कऱ्हाळे लेआउट येथे होणाऱ्या कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी करुन तेथील पूर्वतयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य पथक, पोलीस बंदोबस्त आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासने तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उद्या दुपारी ११:३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत एक लाखाहून अधिक लाभार्थींना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यात ३० हजार ऑफलाईन, तर ७५ हजार लाभार्थींपैकी ई-केवायसी झालेल्या लाभार्थींना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती असणारी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, संजय गायकवाड, विभागीय आयुक्त निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ. अमोल शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी बुलढाणा तालुक्यातील सागवान ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेतून झालेल्या वृक्ष लागवडीच्या कामाची तपासणी केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पवार उपस्थित होत्या. याठिकाणी कडू बदाम, कांचन आणि शिसम या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
०००