समाज व राष्ट्रहित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे  – राज्यपाल रमेश बैस

0
16

वर्धा, दि. ३ : देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान राहिले आहे. देशाला जागतिकस्तरावर नेण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्त्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने परिवर्तनाचा दृष्टिकोन ठेवला आहे. हे धोरण नव्या पिढीला मातृभाषेत शिक्षणाला प्रोत्साहन देते. युवकांनी देशाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी तयार झाले पाहिजे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकुलपती डॉ. प्रशांत बोकारे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, पोलीस अधीक्षक नूरुल हसन, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. ,

राज्यपाल श्री. बैस यांनी जय महाकाली शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. मागील आठवड्यात चंद्रयान तीन ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. यामुळे जगभरात देशाचे नाव झाले. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. या मोहिमेनंतर आदित्य एल -१ ही मोहीम देशाने हाती घेतली आहे. देशाचे नाव जगात लौकिक वाढविणाऱ्या या घटना आहे.

भारताने जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. देशात होत असलेली शैक्षणिक प्रगती आपल्या विकासाचा आधार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने परिवर्तनवादी दृष्टिकोन स्विकारला आहे. आजचे जग हे कौशल्याचे आहे. कौशल्य अंगिकारत आपल्याला प्रयोगशील होणे आवश्यक आहे. भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून भारत करीत आहे, असे राज्यपाल म्हणाले.

सार्वजनिक खर्चातून चालविल्या जाणारी आपली शिक्षण प्रणाली जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची प्रणाली आहे. देशात अनेक ठिकाणी राज्य, केंद्रीय विश्वविद्यालये, मानद, खाजगी विद्यापीठे, राष्ट्रीय महत्वाच्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. देशाच्या विकासात या संस्था महत्वाचे योगदान देत आहेत. जागतिकस्तरावर आपल्या अधिकाधिक संस्थांना मानांकन प्राप्त होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. देशाने ५० टक्के सकल नामांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे.

विद्यापिठे, शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर नव्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रमांचे सुसूत्रीकरण, आधुनिकीकरण व उच्च शिक्षण प्रणालीचा अंगिकार करावा लागेल. आजच्या आधुनिक काळात केवळ साक्षर होऊन उपयोग नाही तर एआय साक्षर होणे गरजेचे आहे. युवकांमध्ये मोठी ताकद आहे. युवकांनी संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र मानले पाहिजे. स्वत:ला काही क्षेत्रांपुरते मर्यादित न ठेवता देशातील कोणतेही राज्य आणि जगात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी संस्थेची माहिती दिली. उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, डॉ. प्रशांत बोकारे, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

जय महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने बांधण्यात आलेल्या शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन व आभार संध्या शर्मा यांनी केले.

०००

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here