जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा – राज्यपाल रमेश बैस

वर्धा, दि. ३ (जिमाका) : पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे काम करत असतात. कामाचा ताण असतांनाही ते कर्तव्यात कसूर करत नाही. त्यामुळे विभागाच्यावतीने त्यांच्यासाठी ‘मेडीटेशन’सारखे उपक्रम राबविण्यासोबतच जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

शासकीय विश्राम भवन येथे राज्यपालांनी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला, अनेक बाबी जाणून घेतल्या. यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.

राज्यपालांनी जिल्ह्यातील सिंचन, कृषि, खरीप हंगामाची स्थिती व विविध शासकीय योजनांची माहिती व प्रगती यावेळी जाणून घेतली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरण केले. जिल्ह्याच्या एकूनच स्थितीचा आढावा त्यांनी सादरीकरणातून राज्यपालांसमोर मांडला. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. दरवर्षी पडणाऱ्या पावसाचा दहा टक्के भाग सुध्दा उपयोगात येत नाही. सगळे पाणी वाहून जाते. कमी खर्चात छोट्या छोट्या योजना करून पाणी कसे साठविता येईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना राज्यपालांनी केल्या.

मनरेगातून पाणी साठविण्याच्या योजना केल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी त्याचा उपयोग होईल. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्वाचा आहे. या हंगामात त्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या मिळाल्या पाहिजे. याबाबतीत शेतकऱ्यांची फसगत होणार नाही, याकरीता विशेष दक्षता घेतली गेली पाहिजे. निविष्ठा उत्तम दर्जाच्या नसल्यास शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षच वाया जाण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले. आदिवासी घटकासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, शाळाबाह्य मुले, ग्रामपंचायत भवन, ग्रामसभा आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्याचे पर्यटन, आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, वनहक्क कायदा, पीएम किसान, प्रधानमंत्री पिकविमा योजना, नाविन्यपुर्ण योजनेतून राबविलेले उल्लेखनिय उपक्रम, मनरेगा, पीएमएफएमई, पोकरा, शेतकरी उत्पादक कंपनी, आरोग्य विभागाच्या योजना, जलजीवन व स्वच्छ भारत मिशन, अमृत महाआवास, जीवनोन्नती अभियान, शिक्षण विभागाच्या विविध योजना व नाविन्यपुर्ण उपक्रम, उद्यमिता केंद्र, सेवादूत प्रकल्प आदींची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी आपल्या विभागाशी संबंधित बाबींची व नाविन्यपुर्ण उपक्रमांची माहिती राज्यपालांना दिली. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००