सोलापूर, दि.7(जिमाका):- जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलीस विभागाने त्यांच्या स्तरावरून योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा व्यवस्था चोखपणे ठेवावी, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. विखे पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आगामी सणाचा व उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत. गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देऊन उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी त्या त्या भागातील विविध सामाजिक संघटनांची पोलीस विभागांनी बैठक घेऊन त्यांना शांतता टिकवण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच शांतता टिकवण्यात सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना करून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की सीसीटीव्हीच्या माध्यमातून सोलापूर शहर व संवेदनशील भागात नियंत्रण ठेवावे. सोलापूर शहराच्या सर्व भागात सीसीटीव्हीचे नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव सादर करत असताना अहमदनगर शहरात ज्या पद्धतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरावर नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. त्या प्रकल्पाची माहिती घ्यावी व त्या पद्धतीने प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी सांगितले.
पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असेल तर त्याबाबतचा प्रस्ताव नियोजन समितीला सादर करावा, आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पोलीस शहर आयुक्त राजेंद्र माने यांनी सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थाबाबत माहिती दिली तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी पालकमंत्री कक्षाकडे आलेल्या विविध अर्ज व तक्रारींची माहिती पालकमंत्री महोदयांना देऊन त्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्यांनी सादर केला.