कोल्हापूर, दि.8 (जिमाका) : शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत विचार सुरु असून त्याला लवकरच मूर्त स्वरुप येईल. तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन (दसरा चौक) येथे केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) तर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खा. धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शेंडकर, राजेखान जमादार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. राज्यातील शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने शासनाने सुमारे 1100 कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली असून भविष्यात शैक्षणिक सुधारणांचे अनेक निर्णय घेणार असल्याचे सांगून यावर्षीपासून अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) अभ्यासक्रम मराठीतून सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींची निवड अतिशय पादर्शकपणे केली असल्याचे खा. श्री. माने यांनी सांगितले तर कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा गुणवत्तापूर्ण असल्याचे गौरवोद्गार आ. जयंत आसगावकर यांनी काढले.
प्रारंभी भुदरगड तालुक्यातील सचिन देसाई, करवीर तालुक्यातील सुधीन आमनगी व नकुशी देवकर हातकणंगले तालुक्यातील शिवाजी पाटील यांना सन 2023 तर शाहूवाडी तालुक्यातील शोभा पाटील यांना सन 2022 चा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल, श्रीफल, स्मृर्तीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सन 2022-23 व 2023-24 या वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक :-
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022- मारुती डेळेकर (आजरा), सचिन भोसले- (भुदरगड), राजेंद्र शिंदे- (भुदरगड), प्रशांत पाटील- (चंदगड), अर्चना देसाई- (गडहिंग्लज), गीतांजली कमळकर- (कागल), राजाराम नारींगकर- (राधानगरी), विश्वास भोसले-(गगनबावडा), सुषमा माने- (हातकणंगले), महेश बन्ने- (हातकणंगले), दत्तात्रय पाटील- (करवीर), तानाजी घरपणकर- (पन्हाळा), शिवाजी पाटील- (शाहूवाडी), अरुणा शहापुरे- (शिरोळ) सन 2023 पुरस्कार – श्रीमती सुरेखा नाईक- (आजरा), कविता चौगले- (भुदरगड), सरीता नाईक-(चंदगड), पद्मश्री गुरव- (गडहिंग्लज), स्नेहा चव्हाण- (कागल), गणेश पाटील- (राधानगरी), सायली तांबवेकर- (हातकणंगले), राजेंद्र तौदकर- (करवीर), किरण सुतार-(पन्हाळा), कविता मगदूम- (शाहूवाडी), साताप्पा नेजे- (शिरोळ), संजय देसाई- (गगनबावडा) यांना देण्यात आला.
विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 – विजय परिट, (कागल) ; जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 माध्यमिक शिक्षक गट- संतोष सनगर (करवीर) तर उच्च माध्यमिक गट कुंडलिक जाधव (गगनबावडा) व सुषमा पाटील (करवीर) यांना विभागून देण्यात आला.
विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2023 – अनिल चौगले (राधानगरी) यांना तर माध्यमिक शिक्षक गट पुरस्कार विजया दिंडे (करवीर) यांना देण्यात आला.
यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत (सन 2019-20) हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत संभापूरला 5, शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत शिवारेला 3 तर आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीला 2 लाख रुपये तसेच सन 2020-21 व 2021-22 साठी आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत वाटंगीला 5, हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी ग्रामपंचायत 3 तर पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोखलेला 2 लाख रुपयांचे बक्षीस पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देऊन यावेळी गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी तर आभार श्रीमती शेंडकर यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.