कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्णपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांसमवेत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रिया पाटील, शहर उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस व महानगरपालिकेचे अधिकारी, शातंता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर यांनी उपस्थित गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना येणारा उत्सव शांततेने संयमाने साजरा करण्याचे आवाहन केले. उपस्थितांच्या मागणीनुसार मिरवणुकीदरम्यान वाहनांच्या रुंदी बाबत येत्या काळात सूचनाही देवू असे आश्वासन दिले. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा आहे आपण ती परंपरा जपत उत्साहाने येणारा गणेशोत्सव साजरा करू असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक श्री. पंडित म्हणाले की, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली आहे. एक खिडकी योजनेतून नियमाने मंडळाना परवानगी देण्यात येत आहे. उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. जिल्ह्यात व शहरातही बैठका घेवून सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले की, गणरायाचा सण आनंदानी साजरा करूया. पोलीस प्रशासनातील सर्वच अधिकारी व सहकारी सण आनंदाने व सुरक्षित साजरा करण्यासाठी तत्पर असतात. गणेश मंडळांनी उत्सवात इर्शा न बाळगता सहकार्य करावे.
पालकमंत्री केसरकर म्हणाले की, गणेश उत्सव आनंदाने व शांततेने साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. गणरायाचे आगमन व विसर्जन करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनांमध्ये खड्डेमुक्त रस्ते, प्रदुषणमुक्त पंचगंगा नदी, डॉल्बी मुक्त सण साजरा करणे, उत्कृष्ट मंडळाना देण्यात येणाऱ्या पारितोषिकामध्ये रोख रक्कम देणे, सणाबाबत परवानगी व सुविधा आदीबाबत प्रशासनाची बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्याबाबत आश्वासन यावेळी दिले.
00000