स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत केंद्र शासनामार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व शाश्वत स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या श्रृंगारवाडी (आजरा), देवकेवाडी (भुदरगड), खेरीवडे (गगनबावडा), माणगांव (हातकणंगले), पिराचीवाडी (कागल), पाटेकरवाडी (करवीर),  राजगोळी खुर्द (चंदगड), हिटणी व नेसरी (गडहिंग्लज), बाजारभोगाव, कोडोली व पोर्ले तर्फ ठाणे (पन्हाळा), येळवण जुगाई (शाहूवाडी), मजरेवाडी व नांदणी (शिरोळ) या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार धनंजय महाडिक यांनी स्वच्छतेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संबंधित सर्व ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गौरविण्यात आलेल्या 15 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींची राज्य स्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. श्रृंगारवाडी तालुका आजरा, पिराचीवाडी, तालुका कागल, पाटेकरवाडी, तालुका करवीर. या गावांची निवड राज्य स्तरावर करण्यात आली असुन, या गावांची केंद्र समिती मार्फत पडताळणी पुर्ण करण्यात आली.

000