मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या प्रेरणादायी व स्फूर्तिदायी लढ्यापासून बोध घेत कार्य करण्याची गरज

0
13

औरंगाबाद, दि. १५ (विमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामात निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य सेनानींनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी असून यापासून सर्वांनी बोध घेत कार्य करण्याची गरज असल्याचा सूर मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत उमटला.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने वंदे मातरम सभागृह येथे मुक्तिसंग्रामात धगधगता मराठवाडा’ आणि ‘लढ्यातील महिला क्रांतिकारक’ या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महनगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, व्याख्याते सारंग टाकळकर, डॉ. रश्मी बोरीकर, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान
-व्याख्याते सारंग टाकळकर
‘मुक्तिसंग्रामात धगधगता मराठवाडा’ या विषयावर व्याख्यान देतांना श्री टाकळकर म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाविरुद्धच्या लढाईत सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, गोविंद पानसरे, दगडाबाई शेळके, अनंत कान्हेरे, माणिकचंद पहाडे, नारायण पवार अशा विविध स्वातंत्र्य सेनानींचे मुक्ती संग्रामात मोठे योगदान होते. भारतीय सैनिकानी निझामाविरुद्ध ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम राबवून निजामाच्या अधिपत्याखालील सर्व भाग काबीज करत हैद्राबाद संस्थान निजाम मुक्त केले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान असून हा लढा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन अत्यंत तळमळीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विलक्षण असा लढा लढला गेला. यामध्ये सुमारे ६० हजारापेक्षा अधिक सत्याग्रहींनी सहभाग घेतला, २५ सत्याग्रहींनी
तुरुंगवास भोगला तर 102 वीरांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करले असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी रणरागिनींची साथ – डॉ. रश्मी बोरीकर
‘लढ्यातील महिला क्रांतिकारक’ या विषयावर व्याख्यान देतांना डॉ. बोरीकर म्हणाल्या, मराठवाडा मुक्ती संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा अनेक महिला स्वातंत्र्य सैनिक मुक्ती लढ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वतःच्या जीवाची, अब्रूची पर्वा न करता या महिला स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रे पुरविण्याचे काम केले. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी रणरागिनींनी खंबीरपणे साथ दिली. मुक्तीसंग्रामानंतर महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सहभागी होऊन कार्य केले असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी ‘हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील बालवीर’ या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here