शिर्डी, दि.१५ सप्टेंबर (उमाका)- उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यांतील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आजपासून लोकार्पण झाले आहे. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत या ठिकाणी लवकर उभारण्यात येणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.
शिर्डी येथे उत्तर अहमदनगर मधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कामासाठी सुरू करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिवराव लोखंडे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवाशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी , शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले, उत्तर अहमदनगर जनतेसाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी उपयुक्तता आहे. या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक,अडचणी दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे. महसूल विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत कमी मानवी हस्तक्षेप शिवाय पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्यावर महसूल विभागाचा भर आहे. असेही महसूलमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. लाखो शेतकऱ्यांनी एक रूपयात पीक विमा काढला आहे. शेत पीक नुकसानीची २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. असे स्पष्ट करत महसूल मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने तात्काळ करण्याची गरज आहे.
शिर्डी व परिसराच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जागेवर एमआयडीसी, श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित शंभर कोटी खर्चून थीम पॉर्क, सहाशे कोटी खर्चून शिर्डी विमानतळाची नवीन विस्तारित इमारत असे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाबरोबर रोजगारवाढीला चालना मिळणार आहे. असेही महसूलमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
खासदार श्री लोखंडे म्हणाले, अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्यक्षेत्रात संपूर्ण नेवासा तालुक्याचांही समावेश करणे गरजेचे आहे. शेती महामंडळाच्या जागेवर आयटी पार्क झाला तर शिर्डीची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होणार आहे.
आमदार आशुतोष काळे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. आभार अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मानले.