आगामी काळातील सार्वजनिक सण, उत्सव मंगलमय वातावरणात, शांततेत साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

0
13

छत्रपती संभाजीनगर, दि.१६: सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्यातील मोठा उत्सव आहे. आगामी काळातील येणारे सर्व सण, उत्सव तोलामोलात, जल्लोषात, उत्साहात, गुण्यागोविंदाने, शांततेत, भक्तिभावाने मंगलमय वातावरणात कोणताही गालबोट न लागता साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या निराला बाजार येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी उपमहापौर तथा अध्यक्ष राजेंद्र जंजाळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, श्री गणेश महासंघ हा ९९ वर्षांपूर्वी स्थापन झाला असून याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. आज हा महासंघ त्याच डौलाने, जल्लोषाने गणेशोत्सव साजरा करीत आहे. सलग ९९ वर्ष गणेशोत्सव साजरा करत फार मोठी जबाबदारी पाडत असून आपली संस्कृती, परंपरा पुढे नेण्याचे काम महासंघ करीत आहे, याबद्दल महासंघाचे त्यांनी अभिनंदन केले.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. आपले सरकार आल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव निर्बधमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत या वर्षीपासून गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या, मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासून दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी सांगता वर्ष साजरा करीत असून याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आज आपल्या शहराचे छत्रपती संभाजी नगर असे अधिकृत नामकरण झाले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here