छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय होणार – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. 16 : छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय केले जाणार असल्याचा निर्णय आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान दोन लाखावरुन 10 लाख करण्यात येणार आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/