श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

0
11

श्रीनगर, दि. 18 : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली. जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर होऊ देत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.

श्रीनगरमधील लाल चौकात मराठी सोनार समाज राहतो. पूर्वी घरीच गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जात असे. पण 24 वर्षांपूर्वी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये स्थानिक मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग असतो. दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रासह देश- विदेशातील मराठी समाज गणेशोत्सव उत्साहात साजरा करतो. श्रीनगरमधील मराठी समाजामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. आज या मंडळास भेट देऊन त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार म्हणाले की, श्रीनगर येथील लाल चौकात साजरा होणारा गणेशोत्सव हा महाराष्ट्र आणि काश्मीरमधील सौहार्दाचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे नियोजन स्थानिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here