प्रस्तावित कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालया बाबतचा आराखडा त्वरित सादर करा : कृषिमंत्री धनंजय मुंडे

जिमाका, बीड, दिनांक 19 : नुकत्याच झालेल्या  मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीड येथे कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्याबाबत मंजुरी देण्यात आली असून याबाबतच्या पाहणी दौरा कृषिमंत्री धनंजय  मुंडे यांनी आज करून त्वरित आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

परळी तालुक्यातील जिरेवाडी स्थित सोमेश्वर मंदिराच्या परिसरात शासकीय गायरान जमिनीच्या ठिकाणी कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले असून आज कृषिमंत्री श्री मुंडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करून याबाबत आराखडा लवकरात लवकर सादर करण्याबाबत सांगितले. यासह जेथे बनविण्यात येणारे महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण असावे यासाठी, स्पर्धात्मक प्रक्रियेतून उत्कृष्ट ठरणाऱ्याला  कामाचे जबाबदारी सोपवली जावी, अशी सूचना ही श्री मुंडे यांनी यावेळी केली .

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी महाविद्यालयासाठी 154 कोटी, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयासाठी 135 कोटी आणि सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र साठी विसरू 20 कोटी रुपये निर्धारित करण्यात आलेला आहे.

यापैकी जिरेवाडी येथील जागा कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयासाठी योग्य असल्याचे मुंडे यांनी पाहणी करताना सांगितले.

जवळच्या नागापूर धरणातील गाळ आणून येथे  साठवून ठेवा. ज्यावेळी कंपाउंड बांधण्यात येईल, त्यावेळी येथे वृक्षारोपण करावे सूचना त्यांनी केल्या.

सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र  यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा या  परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोणी या गावात आहेत. या गावाची पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी श्री. मुंडे यांनी निर्देश दिले.

आजच्या पाहणी दौऱ्यात  विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचे डॉ. यु.एम. खोडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे अन्य अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

000