मुक्ती दिन व नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : येवला शहरातील मुक्तीभुमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होणारा मुक्तीभूमी दिन कार्यक्रम त्याचप्रमाणे श्री. क्षेत्र कोटमगाव, निमगाव वाकडा व लोणजाई माता यात्रोत्सवाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत. असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

आज येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित 13 ऑक्टोबर २०२३ रोजी होणारा मुक्तिदिन कार्यक्रम, श्री. क्षेत्र कोटमगाव, निमगाव वाकडा व लोणजाई माता, सुभाषनगर येथील यात्रोत्सवासाठी उपाययोजना व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. या बैठकीस येवला उपविभागीय अधिकारी बााबासाहेब गाढवे, निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, १३ ऑक्टोबर रोजी मुक्तीभूमी येथे मुक्तीभूमी दिनाचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने अनुयायी येणार आहेत. त्यामुळे  अनुयायांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे. या कार्यक्रमासाठी बार्टीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांशी समन्वय साधून मुक्तीभूमी येथील बाहेरील बॅराकेटिंग व मुक्तीभूमीच्या आतील सर्व व्यवस्था चोख ठेवावी. कार्यक्रमाच्या दिवशी मुक्तीभूमीच्या परिसरात लावले जाणारे स्टॉल्स हे शिस्तबद्ध रितीने लावले गेले पाहिजे. पोलीस यंत्रणेने लाऊड स्पीकरची परवानगी देतांना कालबद्ध नियोजन करूनच परवानगी द्यावी जणेकरून एकाच वेळी लाऊड स्पीकरच्या आवाजाचा गोंधळ होणार नाही याबाबत योग्य दक्षता घ्यावी. बाहेरील परिसराची संपूर्ण साफसफाई, येणाऱ्या लोकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी व पुरेशा प्रमाणात फिरते स्वच्छतागृह, कार्यक्रम पार पडल्यानंतर स्वच्छतेला नगरपालिका अधिका-यांनी प्राधान्य द्यावे. वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सुसज्ज वैद्यकीय पथक पूर्णवेळ उपलब्ध ठेवावे. उपअभियंता महावितरण येवला यांनी या काळात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची

व्यवस्था तहसीलदार, शहर पोलीस व नगरपालिका यांनी संयुक्तरित्या करण्यात यावी. तसेच पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, श्री. क्षेत्र कोटमगाव यात्रोत्सवाच्या अनुषंगाने औरंगाबाद रोडपासून मंदिरापर्यंत अतिक्रमण असल्यास ते गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्ट यांनी संयुक्तरित्या काढावे तसेच आवश्यक तेथे बॅराकेटिंग करावे. महावितरण अधिकाऱ्यांनी यात्रा काळात सर्व विद्युत पोल, विद्युत जोडण्या, फ्युज बॉक्सची तपासणी करून सुस्थितीत ठेवावे, तसेच पूर्णवेळ विद्युत पुरवठा करण्यात यावा. यात्रेच्या ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, शहर पोलीस, ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टने संयुक्तरित्या कार्यवाही करावी. औरंगाबाद महामार्गावर होणारी पार्किंग व वाहतुकीचे नियोजन हे शहर पोलीस, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तरित्या करावे. यात्रा ठिकाणी दुकाने व स्टॉलसाठी परवानगी देतांना ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करावे. वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत सुसज्ज वैद्यकीय पथक पूर्णवेळ उपलब्ध ठेवावे. संपूर्ण यात्रा कालावधीत परिसराची स्वच्छता ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी निर्जंतूक फवारणी करण्यात यावी. याप्रमाणेच निमगाव वाकडा व लोणजाई माता यात्रोत्सवासाठी नियोजन आणि उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बैठकीत दिले.

मंत्री छगन भुजबळ आढावा घेतांना म्हणाले, विशेष सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. शिबीरात लाभार्थ्यांना रेशन कार्ड अद्ययावतीकरण मोहीम राबविणे. ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, पी एम विश्वकर्मा योजना नोंदणी करणे. उत्पन्न् दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे लाभ देण्यात यावेत. राजापूर व ४० गाव पाणी पुरवठा योजनेसाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाईपलाईन साठी आवश्यक परवानगी देण्यात यावी तसेच  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राजापूर व ४० गाव पाणी पुरवठा योजना व धुळगाव साठवण तलाव योजनेसाठी प्रलंबित असलेला प्रस्ताव  ऑनलाईन सादर करावा. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रादेशिक) यांनी वन जमीन हस्तांतरण प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय आंगणगाव येथे ग्रीन जीमचे  उद्घाटन संपन्न

मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय आंगणगाव येथे जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत ग्रीन जीम चे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले  यावेळी येवला उपविभागीय अधिकारी  बााबासाहेब गाढवे प्रा. अर्जून कोकाटे, शिक्षक उपस्थित होते.

येवला तालुक्यातील रायते येथे सभामंडपाचे झाले लोकर्पण

येवला तालुक्यातील रायते येथे स्थानिक विकास निधीतून (रू १५ लक्ष) साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी येवला

उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, सरपंच भूषण गोठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

0000000