मानवी तस्करी रोखण्यासाठी ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रमाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मुंबई दि. 4 : मानवी तस्करी रोखण्यासाठी युवकांना गुन्हेगारी विश्वाबाबत जागरुक करत, महाविद्यालय स्तरावर तस्करीविरोधी क्लबची स्थापना करण्याचा ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रम राज्य महिला आयोग आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर ऑफ ट्राफिकिंग (अॅक्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्या या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. उद्या, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणाऱ्या या कार्यक्रमास महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आयोगाच्या सदस्य, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील महाविद्यालयीन तरुणांना समाज प्रबोधनात सहभागी करुन घेत महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न राज्य महिला आयोग ‘यंग इंडिया अनचेन्ड’ या उपक्रमाद्वारे करत आहे.

या उपक्रमाद्वारे महाविद्यालयात मानवी तस्करी विरोधी क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जागरुक करत त्यांचा समाज प्रबोधनात सहभाग वाढवणे, महिला व बालकांविरोधात होणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांबाबत अवगत करणे, महाविद्यालयीन कॅम्पस तरुणींसाठी सुरक्षित असेल या दृष्टीने प्रयत्न करणे, गुन्हा घडल्यास तरुणांनी त्याबाबत आवाज उठवावा, तरुणांच्या धोरण निश्चितीमध्ये मुलांचा सहभाग वाढवणे, विविध समाज घटकांशी तरुणांचा संवाद घडवून आणणे अशी विविध उद्दिष्ट या उपक्रमाद्वारे पूर्ण करण्यावर भर राहणार आहे.

अलायन्स अगेन्स्ट सेंटर्स ऑफ ट्राफिकिंग (अॅक्ट) या अंतर्गत प्रकृती ट्रस्ट, युवा रुरल असोसिएशन, प्रथम, विप्ला फाउंडेशन अशा विविध संस्था मानवी तस्करी रोखण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. ॲक्ट आणि राज्य महिला आयोगाच्या वतीने होणाऱ्या ‘यंग इंडिया अनचेन्ड’ शुभारंभ प्रसंगी महिला व बाल विकास मंत्री, आयोगाच्या अध्यक्ष यांच्यासह एनडीआरएफचे माजी महासंचालक डॉ. पी. एम. नायर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

०००

संध्या गरवारे/विसंअ/