नंदुरबार दि. ६ (जिमाका): नोव्हेंबर महिन्यात भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती दिवसाच्या निमित्ताने होणारा राज्यस्तरीय जनजाती महोत्सव, तसेच डिसेंबर महिन्यात जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रौप्य महोत्सव, जनजाती दिवसाच्या आयोजनासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत पवार, तहसीलदार नितीन गर्जे (नंदुरबार), दिपक गिरासे (शहादा) सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया, तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले की, १५ नोव्हेंबर रोजी देशभर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती दिवस म्हणून साजरा केली जाते. या जयंती निमित्त राज्यस्तरीय जनजाती दिवस महोत्सव १५ ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नंदुरबार येथे होणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत विविध सासंकृतिक कार्यक्रम, आदिवासी लोकनृत्य, हस्तकला, आदिवासी बांधवांच्या विविध पारंपरिक वेशभुषा, आभूषणे यांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
डॉ. गावित म्हणाले की, डिसेंबर २०२३ पासून जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून ९ डिसेंबर २०२३ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत रौप्य महोत्सवानिमित्त प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यात प्रमुख्याने स्थानिक व बाहेरील कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत माहितीपट व प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वसमावेशक व नाविण्यपूर्ण व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या स्तरावर स्वतंत्र नियोजन करावे, अशाही सूचना यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी केल्या.
यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, डॉ. कांतीलाल टाटीया यांनी सहभाग घेतला.
सामुहिक वनदावे उपयोगात आणावेत
वनपट्टे वाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री डॉ. गावित म्हणाले की, वन हक्क जमीन उपयोगात यावी म्हणून गाव समित्या नेमल्या होत्या. या समित्यांनी एनजीओच्या माध्यमातून मोजणी करणे अपेक्षित होते परंतु अद्याप ते झालेले नाही आणि शेकडो एकर वन जमीन पडून आहे. सामायिक वनदावे उपयोगात आणले जाणे आवश्यक आहे. गावकऱ्यांनी ताबडतोब सामूहिक नियोजन करून त्या उपयोगात आणावे. वृक्ष लागवड सारखे उपक्रम राबवावेत. आदिवासी विकास विभागामार्फत सर्व सहकार्य दिले जाईल. बांबू, महू, तेंदू , डिंक यासारखी लागवड केल्यास पूर्वीप्रमाणे जंगल उत्पादन घेता येईल. त्या प्रत्येक गावाला रोजगार मिळेल. वनउपज घेता येईल तसेच त्यावर आधारित वस्तू उत्पादन वाढवता येईल. सामायिक वन हक्क क्षेत्र मोठे आहे आणि मोजणी करणारे मनुष्यबळ कमी आहे याविषयी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन निर्णय केला जाईल, असेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
०००