पुणे, दि. 6: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याची माहिती साहित्यरुपाने जनसामान्यांना सहज उपलब्ध होण्याच्यादृष्टीने महाज्योतीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रकाशित करण्यात येईल, अशी घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर येथील मंडळाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक प्रवीण देवरे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रकाशित करण्याचा ठराव संमत करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी 10 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. याशिवाय सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या लाभार्थ्यांनादेखील समान लाभ देण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
श्री. सावे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित समग्र वाङ्मयाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात करण्यात आले. महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी योजनेतील विद्यार्थ्यांना टॅब व सीमचे आणि कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार पत्राचे वाटपही यावेळी करण्यात आले.