जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. ७ (जि.मा.का) – जिल्ह्यातील बचत गटांच्या महिला विविध प्रकारची व उत्कृष्ट उत्पादने तयार करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात उमेद मेळावा, तसेच बचतगट पुरस्कार, घरकुल व स्वच्छता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी श्री चंद्रा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

महिलांच्या प्रगतीसाठी शासन विशेष प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले,   नुकतेच शासनाने बचत गटांचे खेळते भांडवल १५ हजार वरून ३० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी – चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या मोठ्या मॉलमध्ये आपल्या जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच यासाठी महिलांनीही साथ द्यावी. जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेऊन बचत गटांच्या उत्पादनांना कशा प्रकारे व वेळापत्रकानुसार  विक्रीसाठी पाठवण्याचे नियोजन करावे. निवडक चांगल्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करावे. त्यामुळे उत्पादनांचा दर्जा वाढेल आणि शहरांमध्ये चांगली बाजारपेठ निर्माण होईल. घरकुल योजनेत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. त्याबद्दल मी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो.

खासदार श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांना समाजामध्ये चांगले स्थान निर्माण करण्याची संधी उमेद ने दिली. कर्तृत्व सिद्ध करण्यास वाव दिला. महिलांनीही पुढे जाऊन नवनवीन व्यवसाय करावेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. या बद्दल सर्वांना शुभेच्छा.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खिलारी यांनी उमेद अभियानामध्ये जिल्ह्यात झालेल्या आणि सुरू असलेल्या कामाचा तसेच घरकुल योजना, स्वच्छता अभियान या विषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेच्या २० लाभार्थीना लाभ वाटप करण्यात आला. तसेच महा आवास अभियान ग्रामीण पुरस्कार, अमृत महा आवास अभियान पुरस्कार, महा आवास योजनेत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमास बचत गटाच्या महिला, घरकुल योजनेचे लाभार्थी, स्वच्छ्ता अभियानातील पुरस्कार्थी, आरोग्य विभागातील पुरस्कार्थी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.