मुंबई, दि. 18 : अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या साकोली येथील नवीन कृषि महाविद्यालयाच्या निर्मितीसंदर्भात तसेच साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता५० खाटांवरुन १०० खाटांमध्ये वाढविण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी महाविद्यालयासाठी निकषानुसार आवश्यक असलेली ३० हेक्टर जागा तातडीने निश्चित करण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश यावेळी दिले. १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधणीसंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने निधी उपलब्ध व्हावा यासाठी तातडीने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवावा,सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी,अशा सूचना श्री.पटोले यांनी यावेळी दिल्या.
कृषी महाविद्यालयासाठी जिल्हाधिकारी,भंडारा यांच्या अखत्यारितील शासनाकडील जागा निश्चित करण्यात यावी,या संबंधिच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात यावी जेणेकरुन कृषी महाविद्यालय निर्मितीचे काम लवकर सुरु होईल तसेच उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ५० खाटांवरुन १००खाटांमध्ये तातडीने परावर्तीत व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य,सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
विधान भवनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव,डॉ.प्रदिप व्यास,कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह या विभागांचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००