महामार्गासह इतर रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 25, (जि.मा.का.) – जिल्ह्यातील अनेक गावांबाहेर व शहरांबाहेर महामार्ग व इतर रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात गावठाणाबाहेर ग्रामिण मार्ग, इतर ग्रामीण मार्ग, मुख्य जिल्हा मार्ग, राष्ट्रीय महामार्गावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी श्री चंद्रा, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.

            नागरिकांना गावाबाहेर कचरा टाकण्याची लागलेली सवय मोडणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी फिरत्या पथकांची स्थापना करावी. ज्या प्रमाणे ग्राम स्वच्छता अभियानामध्ये गुडमॉर्निग पथक तयार करण्यात आले होते. त्या धर्तीवर हे पथक असावे. ग्रामिण भागात गट विकास अधिकारी आणि शहरी भागात मुख्याधिकारी यांनी याविषयी कडक कारवाई करावी. या करण्यात येणाऱ्या कारवाईचा अहवाल रोजच्या रोज घेण्यात यावा. नगर पालिका क्षेत्रातही हे प्रमाण मोठे आहे. त्याची गांभिर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी. टाकल्या गेलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या स्तरावर याविषयी नियोजन करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वीत केलेले आहेत. ज्याठिकाणी हे प्रकल्प कार्यान्वीत केलेले नाहीत तेथे लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही करावी. लोकांनीही अशा प्रकारे कचरा रस्त्याच्या कडेला टाकू नये, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.

00000