आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. १२ : भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याला साजेशे असे भव्य स्मारक नाशिक जिल्ह्यात उभारण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारक उभारणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राघोजी भांगरे यांच्या स्मारक उभारणीसाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक  आणि आराखडा संबंधित जिल्हा समितीने तयार केला आहे. मात्र या प्रस्तावामध्ये भूसंपादन आणि इतर  बाबींचा समावेश करुन एकत्रित आराखडा समितीने तयार करण्याच्या सूचना देऊन  हा प्रस्ताव राज्य शासनाकडे तात्काळ पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, शौर्य नव्या पिढीसमोर मांडण्यात हे स्मारक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्यामुळे त्या दृष्टीने सर्वसमावेशक बाबींचा समावेश करुन स्मारकाची उभारणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

००००००