आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि.१५: महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडी बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील. मुंबई महापालिकेने आठवडी बाजारांचा अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे गौरवोद्गार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.

जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी ‘आठवडी बाजार’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आले ते बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महिला बचतगट खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात जिथे जागा उपलब्ध होईल, त्या – त्या ठिकाणी असे उपक्रम राबविण्यात येतील. राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजनांचाही लाभ या बचतगटांना मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे,  असेही मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, गोरेगाव येथेही बचत गटांसाठी आठवडी बाजार लवकरच सुरू करणार आहोत. या बचतगटांना महापालिकेतर्फे २० हजार रूपये अनुदान देण्यात आले असून बचत गटांना ब्रॅण्डींग करण्यासाठी महापालिकेतर्फे पूर्णपणे सहकार्य केले जाईल. गोरेगावमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेलही लवकरच सुरू होणार आहे. तसेच ज्या महिला घरकाम करतात अशा महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर बालसंगोपन केंद्रही सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांना शासनस्तरावर सहकार्य करण्यात येणार असून स्व:ताचा उद्योगव्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान अथवा कर्ज दिले जाईल. तसेच ज्या महिला घरी बसून शिलाई मशिन अथवा कांडप यंत्र चालविणे असे काम करू इच्छितात अशा पात्रताधारक महिलांसाठी १०२ कोटी रूपयांची तरतूदीतून त्यांना साहित्य वितरण करण्यात येईल, असेही डॉ. शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमाला नगरसेवक पंकज यादव, अभिजित सामंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर, एशिया पॅसिफिक लीड पब्लिक सेक्टर इनोवेशनच्या (यूएनडीपी) श्रीमती आफ्रिन सिद्दीकी, पब्लिक डिप्लोमसी ऑफिसर (वाणिज्य दूत कार्यालय, अमेरिका ) श्रीमती सीटा रैटा उपस्थित होते.

०००