मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. यात ६४ हजार १९८ शाळांमधून ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील १५ लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत. या अनुषंगाने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रभावी १०० शाळांचा लवकरच मुंबई येथे सत्कार केला जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता. या प्रकल्पात विद्यार्थी कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर ६४ हजार शाळांच्या सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीरपणे थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देऊ लागले.
या टप्प्यात विद्यार्थ्यांनी घाण करणाऱ्याला ती साफ करायला विनंती करणे अपेक्षित होते. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंवा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येऊ लागली आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हीडिओ तयार करून समाज माध्यमांवर शेअर करणेही त्यांना आवडू लागले. पहिल्या टप्प्यात असे १५ लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी प्रस्तावित केलेल्या या संकल्पनेला गती मिळाली आहे.
यापुढील दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची आणि वर्ग शिक्षकांना रोज स्वच्छता मॉनिटरगिरी केल्याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी दाखवून दिल्याने सगळेच नागरिक जागरूक राहतील आणि महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी मुक्त बनेल, अशी अपेक्षा या प्रकल्पाचे संचालक रोहित आर्या यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बुलढाणा, जालना, सातारा, मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केली असून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, अंकुशनगर, जि.जालना; मत्स्योदरी विद्यालय, अंबड, जि.जालना; युगधर्म पब्लिक स्कूल, बुलढाणा; आदर्श जि.प. स्कूल, बोरखेडी, जि.बुलढाणा; एन.व्ही. चिन्मया विद्यालय, शेगाव आणि जनता हायस्कूल, जालना या शाळांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/