आपत्ती निवारण कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 17 : राज्यातील आपत्ती निवारण विषयक सुरू असलेली सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, खारभूमी विकास आणि ऊर्जा या विभागांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मदत व पुनर्वसन विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठक झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जलसंपदाचे सचिव राजेंद्र मोहिते, राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक आप्पासो धुळाज, महावितरणचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आर.पी. नि. घटे यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपत्तींची तीव्रता कमी होवून  मनुष्य व जिवित हानी होवू नये यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. पावसाळा संपल्यानंतर जी कामे होणे अपेक्षित आहे ती कामे गतीने करण्यासाठी यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड प्रतिबंधात्मक कामे ही कामे केली जावीत. कोकणामध्ये करण्यात येणारी आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची कामे, आपत्ती प्रतिबंधक कामे वेळेत पूर्ण करावीत. काही खाजगी संस्था देखील आपत्ती निवारण क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाच्या कामांचे तांत्रिक  व प्रशासकीय मंजूरी तपासून पहा आणि गुणवत्तापूर्ण कामे करा. पावसाळी हंगामात झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना देण्यात येणारी मदत देखील वेळेत वितरीत करावी. यंदा काही ठिकाणी गोगलगायीमुळे झालेले पिकांचे नुकसान देखील झाले आहे त्याचेही पंचनामे काटेकोरपणे करा. न्यायालयाच्या आदेशानुसार भुकंप ग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला देणे, कोयना भुकंप पुनर्वसन आणि पुनर्वसन विषयक कामेही प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

आपत्तीची सूचना देणारी अद्यावत यंत्रणा उभारणार : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात जागतिक हवामान बदलामुळे राज्यात विविध ठिकाणी वादळे, अतिवृष्टी, पूरपरिस्थीती, दरड खचणे अशा आपत्ती घडत आहेत. या आपत्तींचा सामना करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग विविध उपाययोजना करत आहे. आपत्ती पूर्व आणि आपत्ती नंतर काय काळजी घ्यावी यासाठी विविध प्रशिक्षण, राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना, जी.आ.एस.चा वापर करून आपत्तीची तीव्रता मोजणे, विभागाचा स्वतंत्र उपग्रह असावा का याबाबतची सविस्तर आराखडा तयार करणे,आपत्ती पूर्व सूचना प्रणाली देणे राज्यातील ६ हजार ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार आहोत ही कामे प्राधान्याने पूर्ण करणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

*****