महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी ‘युएसआयबीसी’शी सहकार्य अधिक दृढ करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 19 :- भारताची अमेरिकेशी व्यापार भागीदारी मोठी असून अमेरिकेतील अनेक कंपन्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळत असून महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी ‘युएसआयबीसी’शी सहकार्य अधिक दृढ करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘युएसआयबीसी'( युनाइटेड स्टेटस – इंडिया बिझनेस कौन्सिल) ग्लोबल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स प्रतिनिधी मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अर्थ, उद्योग आणि व्यापारविषयक विविध क्षेत्रातील संधी व सहकार्याबाबत चर्चा झाली.

यावेळी ‘युएसआयबीसी’ बोर्ड चेअरपर्सन एड नाईट, अध्यक्ष (निवृत्त राजदूत) अतुल केशप, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था बनत आहे. उद्योग, अर्थ आणि व्यापार क्षेत्रात ‘युएसआयबीसी’चे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक नामवंत अमेरिकन कंपन्यांत महाराष्ट्रातील तरुण आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.

स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल मध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून महाराष्ट्र डेटा सेंटर आणि युनिकॉर्नची राजधानी आहे. विकास हा शाश्वत असणे गरजेचे असते. यासाठीच पर्यावरणपूरक ऊर्जा वापरावर महाराष्ट्र अधिक भर देत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहने टप्प्या-टप्प्याने इलेक्ट्रॉनिक पद्धतीत बदलण्यात येत आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यात येत आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील उद्योग उभारणी अधिक वेगाने होण्यासाठी ‘युएसआयबीसी’शी सहकार्य अधिक वाढविण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगतीपथावर अग्रेसर असून महाराष्ट्राशी असलेली भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. उद्योग उभारणीच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वार्थाने योग्य ठिकाण ठरते आहे. विविध क्षेत्रात सहकार्य दृढ होत असून महाराष्ट्राशी सहकार्य वाढविण्यात येईल असे  ‘युएसआयबीसी’ बोर्ड चेअरपर्सन एड नाईट, अध्यक्ष (निवृत्त राजदूत) अतुल केशप यांनी सांगितले.

अर्थ,उद्योग आणि व्यापारवाढीसाठी कार्यरत ‘युएसआयबीसी’

यू.एस.-इंडिया बिझनेस कौन्सिल जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांना जोडणारी महत्वपूर्ण परिषद आहे.  स्थानिक आणि जागतिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिक आव्हानांवर शाश्वत उपायांसाठी प्रेरणा देण्याचे काम परिषद करते.

यू.एस.-इंडिया बिझनेस कौन्सिलचे उद्दिष्ट भारत आणि युनायटेड स्टेट्स दरम्यान उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणे आहे.

उद्योजकता वाढीस लागण्यासाठी व्यवसायांशी संलग्न होत दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारींना पाठिंबा देऊन भारत आणि युनायटेड स्टेट्स दरम्यान द्विपक्षीय व्यापार वातावरण तयार करण्याचेही उद्दिष्ट आहे.  रोजगार संधी आणि जागतिक अर्थव्यवस्थेत परिषद यशस्वीरित्या योगदान देत आहे.

युनायटेड स्टेट्स आणि भारत यांच्यातील व्यवसाय सुलभ, अधिक कार्यक्षम आणि अधिक फायदेशीर बनविण्यावर परिषदेचा विशेष भर आहे.

एरोस्पेस आणि संरक्षण, बँकिंग, खाजगी इक्विटी आणि डिजिटल पेमेंट, डिजिटल अर्थव्यवस्था,ऊर्जा आणि पर्यावरण, अन्न, शेती आणि किरकोळ पायाभूत सुविधा, कायदेशीर आणि व्यावसायिक सेवा, उत्पादन क्षेत्र, मीडिया आणि मनोरंजन कर, विमा आणि रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स या क्षेत्रात परिषद कार्यरत आहे.

—–0000——-