मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे पाठबळ; कल्याणकारी योजनांचाही लाभ

मुंबई, दि २०:- चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन, कामाचा करारनामा, बोनस, उपदान प्रदान, भविष्य निर्वाह निधी, भारतीय कर्मचारी विमा योजना, बालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभही दिला जाणार  आहे.

चित्रपट, मालिका व इतर मनोरंजन कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून अनेकदा कलाकार, तंत्रज्ञ  व कामगारांचे वेतन थकविण्याचे प्रकार घडत असतात. यासंदर्भात विविध कामगार संघटनांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी कामगार विभागाने २०२१ व २०२२ मध्ये चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील कामगार संघटना यांच्यासोबत चर्चा करून सर्वंकष कार्यप्रणाली तयार केली आहे.

सदरची मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी चित्रपटसृष्टीतील सर्व मालक, निर्माते,  कामगार, सह कलाकार, तंत्रज्ञ तसेच कामाच्या स्वरुपानुसार काम  करणाऱ्या सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे.

कार्यप्रणाली कुणाला लागू

मानक कार्यप्रणाली ही राज्यातील चित्रपट, दूरचित्रवाणीदर्शन मालिका, जाहिरात विभाग, डिजिटल उद्योग व इतर असंघटित करमणूक क्षेत्रातील विभागांमध्ये काम करणारे व्यावसायिक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, ॲक्शन ॲण्ड स्टंट दिग्दर्शक, कलावंत (सर्व प्रकारचे अभिनय करणारे कलाकार, सह कलाकार, नायक, नायिका, सह नायक, सहनायिका, गायक, व्हाइस एडिटर, लेखक, बाल कलाकार इ. तंत्रज्ञ ध्वनी मुद्रण करणे, एडिटिंग करणे, साऊंड रेकॉर्डिस्ट, हेड कॅमेरामन इ. कामगार, (रंगमंच उभारणारे कामगार म्हणजेच हेड टेपिस्ट, असिस्टंट टेपिस्ट,  हेड पेंटर,पेंटर, कारपेंटर, हेड कारपेंटर, असिस्टंट कारपेंटर, पॉलिशमन, पीस मोल्डर, मोल्डर, कास्टर, लाईटमन, स्पॉट बाय, प्रॉडक्शन बॉय, क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, जनरेटर ऑपरेटर, हेल्पर, फोटोग्राफर्स, साऊंड इंजिनिअर्स, स्टंट आर्टिस्ट, सहायक कोरस गायक /गायिका, महिला/ पुरुष सह कलाकार, सिने वेशभूषा व मेकअप आर्टिस्ट, ॲक्शन डबिंग इफेक्ट आर्टिस्ट, नर्तक (देशी, परवानगी धारक विदेशी), ज्युनिअर आर्टिस्ट, छायाचित्रकार,ड्रेस मन, बॅकस्टेज आर्टिस्ट, तृतीयपंथी भूमिका करणारे कलावंत)  बालकलाकार व इतर तत्सम स्वरूपाचे काम करणारे कामगार,  कर्मचारी,तंत्रज्ञ, तसेच असंघटित क्षेत्रातील शासनाने घोषित केलेल्या ३०० प्रकारचे उद्योग व्यवसायाच्या यादीमधील क्र. ६५ ते क्र ७७ नुसार करमणूक व संबंधित काम करणारे कामगार जसे की; दृकश्राव्य कामाशी संबंधित कामगार वाजंत्री कॅमेरामन सिनेमाशी संबंधित कामे सिनेमा प्रक्षेपणा संबंधित कामे सर्कस कलाकार नर्तक गोडीस्वारा जादूगार मॉडेल कवी लेखक इत्यादींना लागू राहील त्याचबरोबर दूरदर्शन मालिका निर्मिती, लघुपट निर्मिती, वेब सिरीज निर्मिती, जाहिरात पटनिर्मिती, ऑडिओ व्हिज्युअल अल्बम निर्मितीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील ही मानक प्रणाली लागू राहील.

कामगारांना मिळणारे लाभ

किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करणे नियोक्त्यास बंधनकारक. तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन देणे बंधनकारक. सर्व कामगारांचे वेतन त्यांच्या बॅंक खात्यात किंवा धनादेशाद्वारे अदा करणे बंधनकारक. निर्मात्याने कुशल व अकुशल कामगारांशी वैयक्तिक करार केल्यानंतर देय वेतन/ मानधन ३० दिवसांच्या अदा करणे बंधनकारक.

५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणा-या आस्थापनेत ५ टक्के दराने घरभाडे भत्ता, १० व १० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनेत २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असेल अशा कामगारांना सेवा समाप्तीच्यावेळी ८.३३टक्के दराने बोनस, कामगाराने राजीनामा दिल्यास किंवा त्याला कामावरून कमी केल्यास १५ दिवसांचे वेतन ‘य’ हिशेबाने उपदान देय आहे. सिने क्षेत्रात २० पेक्षा जास्त आस्थापना असलेल्या आणि कामगारांचा पगार १५ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्या कामगाराला भविष्य निर्वाह निधी योजना लागू होऊन त्याच्या वेतनातून १२ टक्के व व्यवस्थापकाकडून निधी देण्याचा नियम लागू. भारतीय कर्मचारी विमा योजना १० व १० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना लागू असून २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणा-या कामगारांच्या वेतनातून ०.७५ टक्के आणि मालकाकडून ३.२५ टक्के रक्कम कपात करण्याचा नियम लागू. यामुळे कामगारांना आरोग्य सुविधा, आजारपण, अपंगत्व, प्रसृती इत्यादीसाठी लाभ घेता येतील. कामगारांना इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास कामगार नुकसान भरपाई अधिनियम १९२३ च्या तरतुदीनुसार कामगारांच्या वारसा नुकसान भरपाई देणे बंधनकारक. सिने क्षेत्रामध्ये चित्रीकरणाच्या दरम्यान स्टंट करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी आणि स्टंट करताना आवश्यक असणारी सर्व सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध करून देणे

महिलांची सुरक्षा : रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणांहून घरापर्यंत तसेच घरापासून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी सुरक्षित व सुस्थितील वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे बंधनकारक. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ संदर्भात तक्रार करण्यासाठी समिती गठित करावी. बाह्य चित्रीकरणावेळी स्वच्छतागृह आणि कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था करणे आवश्यक.

बाल कलाकारांची सुरक्षा:-  कोणत्याही बालकास कलाकार म्हणून एका दिवसामध्ये पाच तासांपेक्षा जास्त काम करता येणार नाही. बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणताही बालक सलग २७ दिवस काम करणार नाही याची खात्री करावी. प्रत्येक बालकाच्या वेतनामधून कमीत कमी २० टक्के रक्कम बालकाच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव म्हणून जमा करण्यात यावी.

 

००००००

मनीषा सावळे /वि.स.अ