नाशिक, दि. २१ (जिमाका): देशाप्रती कर्तव्य बजावतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीसांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन पाळला जातो. यानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज पोलीस कवायत मैदान, नाशिक येथे पोलीस स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी या दिनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, २१ ऑक्टोबर, १९५९ रोजी लडाख येथे हॉटस्प्रिंग याठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शिपायांच्या तुकडीवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला होता. यात १० शूर शिपायांनी शत्रुशी निकराने लढा देत देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्यावतीने स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. कर्तव्यावर असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर पोलीस जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मैदानावर उपस्थित पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनीही स्मतिस्थळास अभिवादन केले.
०००