पतसंस्थांनी विश्वासार्हता जपण्याचे काम करावे – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि.२४ : सहकार क्षेत्रात पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करून विश्वासार्हता जपण्याचे काम करावे आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

घोडेगाव येथे श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सोमवारी सायंकाळी आयोजित सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेअंतर्गत १०१ मुलींना शालेयपयोगी साहित्याचे वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी,गट विकास अधिकारी वाळूंज,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर,
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे, सरपंच अश्विनी तिटकारे, पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम घोडेकर आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, सहकारामध्ये विविध संस्था, बँका चुकीच्या कारभारामुळे अडचणीत आल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. संस्थांमधील असलेला पैसा हा जनतेचा असून आपण फक्त त्याचे विश्वस्त आहोत याचे भान ठेवुन संस्थाचालकांनी विश्वस्तांच्या भूमिकेने काम करावे, असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी प्रास्ताविक केले. घोडेगावच्या माजी सरपंच क्रांती गाढवे यांनी आपले विचार व्यक्त केले.