चंद्रपूर, दि. 26 : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र दिला आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला तर आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीला जाईल, याची जाणीव ठेवूनच केंद्र व राज्य सरकारने ग्रामविकासाला प्राधान्य दिले आहे. हाच धागा पकडून ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन आणि रोजगाराच्या विकासाची पंचसूत्री राबविण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट येथे नवीन ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, रामपालसिंग, नामदेव डाहुले, चंद्रकांत डोंगरे, गौतम निमगडे, विलास टेंभुर्णे, अशोक आलाम, कविता जाधव यांच्यासह परिसरातील गावांचे सरपंच उपस्थित होते.
ग्रामीण भागात ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत शेतीचा सर्वांगीण विकास आणि पाणंद रस्त्यांबाबत नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या परिसरात अंगणवाडी, जि.प.शाळा, सिमेंट रस्ते व इतर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात आरोग्याच्या उत्तम सुविधा, गुणवत्तापूर्वक शिक्षण, सिंचनाच्या सोयी, रोजगाराची उपलब्धता या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्यांचे बांधकाम उत्तम असावे, हेच आपले मिशन आहे. विकासाच्या बाबतीत गाव आदर्श होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. अधिका-यांनीही जनतेला सन्मानाची वागणूक द्यावी, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, गाव आदर्श होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अनेक योजना आहेत. महिला शिक्षित तर गाव व समाज शिक्षित होतो. जिल्ह्यातील महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असून त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे. तसेच गावांमध्ये पाणंद रस्ता खडीकरणाचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार यांनी केले.
जंगलालगतच्या गावांसाठी विशेष निर्णय : जंगलालगत असलेल्या गावातील शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी 30 दिवसांत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बफर झोनमधील गावांना पूर्वीप्रमाणेच वर्षाला सहा सिलिंडर मोफत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य : केंद्र व राज्य सरकार मिळून पी.एम. किसान सन्मान निधी अंतर्गत शेतक-यांना आता वर्षाला 12 हजार रुपये देण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार, शेतक-यांना एक रूपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या तिकिट दरात 50 टक्के सवलत आदी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहे.
नंदगुर येथे अन्नधान्य साठवणूक गोदामाचे लोकार्पण : गटग्रामपंचायत पिंपळखुट अंतर्गत येत असलेल्या नंदगुर येथे मनरेगामधून बांधण्यात आलेल्या अन्नधान्य साठवणूक गोदामाचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या गोदामाची साठवणूक क्षमता 250 मेट्रीक टन इतकी आहे. या गोदाममुळे मौजा पिंपळखुट चेक, पिंपळखुट, हळदी, नंदगुर येथील जवळपास 230 शेतक-यांना आपले धान्य साठवूण ठेवण्याकरीता फायदा होईल.
झरी येथे महिला बचत गटाच्या रिसॉर्टचे लोकार्पण : कोळसा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या झरी येथे महिला बचत गटाच्या रायबा रिसॉर्टचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोर्कापण करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वैभवलक्ष्मी महिला बचत गट या नावाप्रमाणेच येथे येणा-या पर्यटकांचे वैभव वाढेल, अशी उत्तम सेवा देऊन गावाच्या विकासाला हातभार लावावा. तसेच बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.