नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.27 (जिमाका):  पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून या वर्षीच्या जुन अखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव  ठेवावा त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे पाण्याचे आर्वतन सोडण्यात यावे तुर्तासतरी या आर्वतनामध्ये बदल करु नये असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा अनावश्यक वापर टाळावा, असे आवानही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे  अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांच्यासह सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी संभाव्य पाणी टंचाई भासणार असल्याने सध्या डिसेंबर 2023 अखेरपर्यंतचे पाण्याचे नियोजन करावे. पाण्याची उपलब्धता पाहून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी प्राधान्याने सोडावे. कोयना धरणातील 67 टक्के पाणीसाठा हा विद्युत निर्मितीसाठी राखीव असतो. याबाबत डिसेंबर नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्यादाचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी राखीव ठेवण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठवावा. सध्याच्या परिस्थितीत रब्बीची आर्वतने ठरल्याप्रमाणे सोडावित,  अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
उत्त्र मांड धरणाची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावी. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उंब्रज ता. कराड परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. ज्या धरणांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावाही केला जाईल. तसेच मागणीनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून 1 टिएमसी पाणी सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

000