नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
चंद्रपूर, दि. 31 : लोकप्रतिनिधी म्हणून मला बल्लारपूर या स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करता आली, हे माझे सौभाग्य आहे. पण या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार येथील सर्वसामान्य नागरिक आहेत, अशी भावना वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. बल्लारपूर तालुका विकासामध्ये असाच कायम अग्रेसर राहावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
बल्लारपूर येथे नगर परिषद प्रशासकीय बांधकामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. कांचन जगताप, न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, हरीश शर्मा, चंदनसिंग चंदेल, किशोर पंदीलवार, आशिष देवतळे, काशिनाथ सिंह, मनिष पांडे, समीर केने, निलेश खरबडे, राजू दारी आदी उपस्थित होते.
बल्लारपूरचा कितीही विकास केला तरी येथील नागरिकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विकासाची अनेक कामे या क्षेत्रात झाली आहे. मात्र संपूर्ण शहराचे नियंत्रण ठेवणा-या नगर परिषदेचीच इमारत राहून गेली होती. आज मात्र या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी करतांना अतिशय आनंद होत आहे.
बल्लारपूरमध्ये रविवारी 1.29 कोटी रुपयांच्या मिनी स्टेडीयमचे भूमिपूजन, 4 कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामाची पायाभरणी आणि 10 कोटीच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. बाहेरून येणा-या व्यक्तीला या शहराचा हेवा वाटावा, असा विकास बल्लारपूरचा झाला आहे. नगर परिषदेच्या इमारतीकरीता जेवढा निधी लागेल, तेवढा दिला जाईल. ही इमारत दर्जेदार आणि अप्रतिम व्हायला पाहिजे, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी अंतर्गत नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या माळ्याचे काम करण्यात येणार असनू यासाठी 9 कोटी 78 लक्ष 71 हजार 792 निधीची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. कार्यक्रमाचे संचालन सतीश कनकम यांनी केले
बल्लारपूर विकासाचे मॉडेल : विसापूर येथील सैनिक स्कूल, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, बल्लारपूर येथील पोलिस स्टेशनची इमारत, आधुनिक जीम, भाजी मार्केट, नाट्यगृह, अभिनव बसस्थानक, विश्रामगृह, शाळांच्या इमारती, महिलांसाठी डीजीटल शाळा, विशेष बाब म्हणून उपविभागीय कार्यालय, नगर परिषद चौक ते कलारी काटा गेट, खुल्या जागांचा विकास, गणपती घाट, छठ घाटांचा विकास आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणांवर तर चित्रपटांची शुटींगसुध्दा करता येते, त्यामुळे मुंबईतील दिग्दर्शकांना बल्लारपूर येथे आमंत्रित केल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
लोकशाहीचे मंदिर तसेच प्रभु रामाच्या मंदीरासाठी जिल्ह्याचे लाकूड : भारताच्या लोकशाहीचे मंदीर असलेल्या नवीन संसद भवनात तसेच अयोध्या येथील प्रभु रामाच्या मंदिरासाठी चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून लाकूड पाठविण्यात आले आहे. तसेच आता भारत – पाकिस्तानच्या सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची संधी राज्याच्या सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून मला प्राप्त झाली आहे.
न.प. निवृत्त सफाई कर्मचा-यांचा सत्कार : नगर परिषदेच्या पायाभरणी समारंभात मुख्याधिकारी विशाल वाघ आणि माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी सेवानिवृत्त सफाई कर्मचा-यांचा सत्कार आयोजित केला, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. या सफाई कर्मचा-यांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर सेवा दिली, त्यांच्या सेवेचा हा सन्मान आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी चंद्रभान जोगी, सुनील पवार, सतिश गोगूलवार, नरसुबाई नख्खा, कमल मनसराम, रामगोपाल मिश्रा, हंसाराणी, अनिल लुथडे, सुनील तुमराम, गुणरत्न रामटेके, कानपल्ली मलय्या, तुलसीराम पिंपळकर, उमाकांत बंडावार आदी सफाई कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
०००