कोकण विभागीय वनहक्क समितीची सुनावणी संपन्न

0
14

ठाणे,दि.2(जिमाका) :-  कोकण विभागीय वनहक्क समितीकडे प्राप्त असलेल्या अपिलांपैकी शहापूर तालुक्यातील अनुसूचित जमातीचे 105 अपील दावे व भिवंडी तालुक्यातील इतर जमातीचे 14 अपील अशा एकूण 119 अपिलांवर विभागीय आयुक्त तथा कोकण विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी, जि. ठाणे यांच्या कार्यालयात दि.31 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीदरम्यान सर्व अपिलकर्त्यांचे वैयक्तिक म्हणणे समितीच्या  अध्यक्ष-सदस्यांनी ऐकून घेतले व अपिलार्थींनी सादर केलेले पुरावे स्वीकारले. सुनावणीदरम्यान अनुसूचित जमातीच्या अपिलकर्त्यांना त्यांच्याकडील वनहक्क दावा निश्चिततेचे पुरावे सादर करण्यासाठी विशेष संधी म्हणून एक महिना मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जमाती व इतर  वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 सुधारित नियम 2012 नुसार, जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या निर्णयाने व्यथित झालेल्या दावेदारांनी, विभागीय वनहक्क समितीकडे अपील करण्याची तरतूद आहे.

यावेळी विभागीय आयुक्त तथा कोकण विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे स्वागत जिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांनी केले. या सुनावणीदरम्यान श्रमजीवी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्रकाश खोडका व दशरथ भालके यांचे विशेष सहकार्य लाभले.

या वनहक्क अपिल सुनावणीच्या कामकाजाच्या वेळी विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष, विभागीय वनहक्क समिती, कोकण विभाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासमवेत मुख्य वनसंरक्षक, ठाणे, श्रीम.के.प्रदिपा या तसेच ठाणे आदिवासी विकास अपर आयुक्त तथा विभागीय वनहक्क समिती, कोकण विभागाचे सदस्य सचिव दीपक कुमार मीना हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.  तर अशासकीय सदस्यांपैकी मनिषा निमकर (माजी आमदार), संगिता भोमटे (सामाजिक कार्यकर्ता), ठाणे आदिवासी विकास उपायुक्त तथा जिल्हास्तरीय वनहक्क समिती, ठाणे चे सदस्य सचिव  प्रदीप पोळ यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (महसूल)   विवेक गायकवाड, ठाणे जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)  गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अमित सानप, भिवंडी तहसिलदार अधिक पाटील, शहापूर तहसिलदार श्रीमती कोमल ठाकूर तसेच महसूल विभाग, आदिवासी विकास विभाग, वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सुनावणीपूर्वी राष्ट्रीय एकता दिवस औचित्याने उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. तसेच कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सुनावणी दिवशी संपूर्ण परिसरात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याची जबाबदारी पोलीस विभागाने उत्तमरित्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here