नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहाय्य – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

ठाणे, दि. ४ (जिमाका) : आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

अनुव्रत विश्वभारती सोसायटीच्यावतीने ठाण्यात आयोजित ‘से यस टू लाईफ, नो टू ड्रग्ज’ या नशामुक्ती राष्ट्रीय परिषदेत श्री. मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी आचार्य श्री महाश्रमणजी, डॉ. गौतम भन्साली, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संजय कुमार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे सचिन जैन, डॉ. एस व्ही खानीलकर, लेखक, दिग्दर्शक मनोज मुंतशीर, जितो चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल कवाड, सी जी डांगी, यांच्यासह विविध मान्यवर, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक अशोक कोठारी यांनी प्रास्ताविक केले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भारत देश हा संस्कारी देश आहे, या देशात सेवा व त्यागाची पूजा होते. आपल्या देशात आपल्या मनाला जिंकणारा सम्राट होतो. पण आज नशेमुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नशामुक्ती अभियान राबविणे आवश्यक आहे. या कामासाठी आपल्याला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

नशामुक्ती ची सुरुवात माझ्या जिल्ह्यातून सुरुवात केली. 2014 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. ज्या व्यसनाने आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते ते फक्त अश्रू नसून ते तुम्हाला पापी बनविणारे मार्ग आहे. देशभक्तीची, समाज सेवेची, नशा असायला हवी.

समाजात नशामुक्ती करताना अनेक प्रश्न निर्माण होतात. हे अडथळे दूर करून नशामुक्त समाजासाठी एकत्र येऊन काम करू. आचार्य महाश्रमनजी यांच्या नशामुक्ती मिशनसाठी सर्वशक्तिनिशी राज्य शासन पाठीशी राहील. हे मिशन सज्जन शक्तीचे आहे, हे मिशन देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या भाविकांचे आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी श्री. पांडे, श्री. भन्साली यांनीही मनोगत व्यक्त केले.

0000