मुंबई, दि.७ : सागर तटीय क्षेत्रात चक्रीवादळापूर्वीची सूचना देणाऱ्या आणि तत्काळ उपययोजना संदर्भात राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम २४ नोव्हेंबरपर्यंत चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन आणि स्थानिकांनी चक्रीवादळासारखी आपत्ती आल्यानंतर कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा. यासाठी ही प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई या जिल्ह्यातील ठिकाणे निवडून प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. स्थानिकांसाठी ही प्रात्यक्षिके फक्त अभ्यासासाठी असून यावेळी घाबरून जावू नये, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक अप्पासो धुळाज यांनी केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्यात चार टप्प्यामध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतर घ्यावयाची खबरदारी बाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. तिसऱ्या टप्प्यात दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून प्रात्यक्षिकांचे आयोजन स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.
या प्रशिक्षण उपक्रमात पालघर जिल्ह्यातील वसई,डहाणू आणि पालघर,ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिंवडी, अंबरनाथ, मुंबई शहर मधील मालाड,शिवडी,दादर,रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, दिवेआगार, ऊरण, श्रीवर्धन, मालाड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, मंडणगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला, नवी मुंबई मधील उरण, न्हावा, शेवा हे सहभागी होणार आहेत.
या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी ही प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी स्थानिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरसमज होवू नये याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.ही सर्व प्रात्यक्षिके केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेल्या कालावधीत पार पाडावीत अशा सूचना राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दिलेल्या आहेत.
००००
संध्या गरवारे/विसंअ