आयुर्वेदाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक – दिनेश वाघमारे

मुंबई, दि. 7 : आयुर्वेदाला सुमारे ३ हजार वर्षांची परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यासाठी आयुर्वेदाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

मुंबई येथील रेसकोर्स येथे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि आयुष्य संचालनालय  एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद करीता “रन फॉर आयुर्वेद” चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, आयुष संचालक डॉ.रामण घुंगराळेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर व डॉ. आर. गोविंद रेड्डी, सहाय्यक संचालक, केंद्रीय आयुर्वेदीय अनुसंधान संस्थान उपस्थित होते.

श्री. वाघमारे म्हणाले की, ‘धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने २०१६ मध्ये “आयुर्वेद दिवस” म्हणून घोषित केला आहे. या वर्षी, आयुष मंत्रालय 8 वा आयुर्वेद दिवस 2023 एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद या घोषवाक्यासह साजरा करत आहे. जी-20 च्या पारंपरिक औषधावर आणि G20 प्रेसिडेन्सीची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ या घोषवाक्यासह प्रत्येक दिवशी प्रत्येकासाठी आयुर्वेद”, मानव प्राणी वनस्पती- पर्यावरण इंटरफेसवर लक्ष केंद्रीत करणे हे उद्दिष्ट आहे.

श्री.वाघमारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रन फॉर आयुर्वेदा मॅरेथॉनची सुरुवात झाली. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मंडळ, प्रभादेवी, हास्य क्लब, वरळी व इतर स्थानिक एन.जी.ओ. यांनी देखील सहभाग घेतला. युनियन बँक ऑफ इंडिया, श्री. धूतपापेश्वर लिमिटेड, चरक फार्मास्युटिकल प्रा.लि. व आर्य वैद्य फार्मसी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनास विशेष सहकार्य केले. प्रभारी सहायक निदेशक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रज्ञा कापसे, डॉ. कुलदीप चौधरी यांनी केले, तर आभार डॉ. घुंगराळेकर यांनी मानले.

००००

 

राजू धोत्रे/विसंअ/