‘मिशन महाग्राम’साठी आयडीबीआय बँकेकडून ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला ११ कोटी ६२ लाखांचा निधी

मुंबई, दि. ८ :- ‘मिशन महाग्राम’ अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व आयडीबीआय बँक यांच्या दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार तसेच धनादेशाचे हस्तांतरण करण्यात आले.

या ‘मिशन महाग्राम’ मध्ये आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने राज्यातील १०४ गावांमध्ये पुढील ३ वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी बँक ११ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच विविध रोजगार निर्मिती व गावाच्या सर्वांगीण विकास कार्यात अग्रणी भागीदार म्हणून सहकार्य करणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला, तसेच बँकेकडून ११ कोटी ६२ लाख रुपयांचा धनादेश ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्रिमंडळातील सदस्य यांच्यासह ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, तसेच आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा, व्यवस्थापकीय संचालक श्रीमती बलजिंदरकौर मंडल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सन २०२२ ते २०२५ दरम्यान ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान- २ हे ‘मिशन महाग्राम’ म्हणून राबविण्यात येणार आहे. याबाबीचा अर्थसंकल्पातच समावेश करण्यात आला आहे.

आयडीबीआय व ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन तर्फे राज्यातील ५ जिल्ह्यांमधील ८ तालुक्यांतील १०४ गावामंध्ये कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, ग्रामीण गृह निर्माण क्षेत्र, ग्रामीण आरोग्य क्षेत्र, पाणी पुरवठा व स्वच्छता व जलसंधारण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उपजीविका क्षेत्र आणि विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व कन्नड तालुके, जळगाव मधील जामनेर, पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड, सोलापूर मधील अक्कलकोट व पंढरपूर, आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यांचा समावेश आहे.

00000