श्वसन विकाराच्या रुग्णांसाठी सर ज.जी. समूह रुग्णालयात विशेष उपाययोजना – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि.८ : हवेत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुंबई व उपनगरामध्ये सर ज.जी. समूह रुग्णालय हे एकमेव राज्य शासकीय रुग्णालय असून या रुग्णालयामध्ये श्वसन विकारग्रस्त रुग्णांना तातडीचे उपचार मिळावे यासाठी औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

त्यामुळे ज्या रुग्णांना श्वसनविषयक त्रास होत आहे, अशा रुग्णांना या कक्षामध्ये तातडीने उपचार मिळू शकतील. बाह्यरुग्ण विभागामध्ये श्वसनग्रस्त रुग्णांना सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी १२:३० पर्यंत येता येईल. तसेच दुपारनंतर केव्हाही रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये येऊन त्याबाबतचे उपचार घेता येणार आहेत. स्वतंत्र श्वसन विकार कक्ष औषधवैद्यकशास्त्र विभाग व छाती व क्षयविकार विभाग हे संयुक्तरित्या चालविणार आहेत. श्वसन विकारासाठी लागणाऱ्या औषधांची कमतरता पडता कामा नये. याबाबत संस्थास्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले आहेत.

श्वसनग्रस्त रुग्णसंख्येचा दैनंदिन अहवाल वरिष्ठ कार्यालयास दररोज सादर करण्यात येणार आहे. श्वसनग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र रुग्णकक्ष राखून ठेवण्यात आला असून त्यामध्ये संबंधित रुग्णांस आवश्यक असलेल्या न्यूम्युलाझेशन व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

 

00000

राजू धोत्रे/विसंअ