पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२: – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

उद्या गुरूवारी (दि. २३) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कार्तिक एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून कार्तिक एकादशीच्या तयारीचा आढावा घेतला. या संवादात मंदिर समितीचे गहिनीनाथ अवसेकर महाराज यांच्यासह, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंढरीची वारी हा आपल्या सगळ्यांच्याच आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आपल्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वच यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. कार्तिक एकादशी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी विविध घटकांनी समंजसपणे पुढाकार घेतला आहे. ही चांगली बाब आहे. पंढरपूरची वारीही आपली संस्कृती आहे. ती आपण सगळ्यांनी मिळून जतन केली पाहिजे.  आपण राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस प्रवास आणि महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे या वारीसाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी येतील. त्यांना विठुरायाचे दर्शन घेता येईल. ही एक प्रकारे सेवाच आहे. त्यामुळे आमचे प्रशासन देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी मनापासून प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. यासाठी पोलीस प्रशासनासह, विविध यंत्रणांचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी पंढरपुरातील स्वच्छता या घटकाविषयी विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, तसेच चार विश्रांती कक्षांची उभारणी, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, नदी किनाऱ्याची स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, आरोग्य शिबीरांचे आयोजन याविषयीही त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वारकरी आणि पंढरपूर वारीबद्दल आस्थेने पुर्वतयारीचा आढावा घेतल्याबद्दल श्री. अवसेकर महाराज यांनी आभार मानले.

००००