महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई दि. 22 : महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना प्रशासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर यांनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, अनुयायांकरीता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, अतिरिक्त एसटी बस व्यवस्था याबाबत आढावा घेतला. आरोग्य विभागातर्फे देखील आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत श्री.कल्याणकर यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कोकण विभागीय महसूल उपायुक्त विवेक गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्यावतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या.

******

शैलजा पाटील/विसंअ/