धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांच्या संस्कारानुसार जनतेचे भले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.२७ (जिमाका) :- सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्यांचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत. दिघे साहेबांनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

धर्मवीर-२ या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, झी-24 चे मंगेश कुलकर्णी, धर्मवीर-2 चित्रपटाची निर्मिती टीम व कलाकार उपस्थित होते.


याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री महोदयांनी सर्वप्रथम धर्मवीर स्व.आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या धर्मवीर १ व २ चे सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तांत्रिक सदस्य, अशा सर्व टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्वस्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. त्यांच्याच संस्कारावर व शिकवणीवर आपले शासन काम करीत आहे. गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून अनेक गरजूंना काम मिळणार आहे. समृद्धी महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळण्याच्या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राज्यात यशस्वीपणे राबविला. आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.


कोणतीही भूमिका साकारताना सर्वस्व अर्पण केल्यावरच यश मिळते, त्याप्रमाणे हे शासन सदैव गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा विचार करीत काम करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानले. सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि धर्मवीर स्व.दिघे साहेबांचे लोकसेवेचे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनी आवर्जून पाहावे, असे आवाहनही केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यानंतर त्यांच्या हस्ते मुहूर्ताची पूजा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रस्तावना करताना चित्रपटाची पार्श्वभूमी सांगितली. याप्रसंगी धर्मवीर स्व.आनंद दिघे यांची भूमिका साकारलेल्या श्री. प्रसाद ओक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

000