मुंबई, दि. 30 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलार, डीएमआयसीमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, वाळूज ते शेंद्रा ओव्हर ब्रीज या कामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेऊन, या विकासकामांना गती द्यावी अशा सूचनाही यावेळी दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील विकास कामांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित(एनटीपीसीचे) व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव(रस्ते)श्री.साळुंके, डॉ.कराड यांचे खासगी सचिव अमित मीना, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पैठण येथील जायकवाडी धरणावर बाराशे मेगावॉट ऊर्जा निर्मितीचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येईल.
तसेच पक्षी अभयारण्य आणि पर्यावरणाबाबत सर्वेक्षणासाठी तातडीने एजन्सी नियुक्त करून पर्यावरण, स्थानिक पातळीवरील अडचणी पक्षी अभयारण्य, आरक्षण याबाबत सर्वेक्षण करून घ्यावे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. त्यानंतर हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. याबाबतच्या पर्यावरण विषयक परवानगीसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगर शहराचा सध्या होत असलेला विस्तार, वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जालना रोडवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहत फ्लाय ओव्हर ब्रीज याबाबत माहिती घेऊन ही विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/