भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई, दि,६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

०००