मंत्री सुधीर मुनगंटीवार होणार ‘गुड गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि.7 : दी सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड’ राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सर्वोत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल दिला जात आहे.

मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविणे, राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री.मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींनाही यावेळी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे. अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार, रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच दूरध्वनी वर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ चे अभियान, आपल्या देशातील नवीन संसदभवन आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीसाठी चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि नुकत्याच चंद्रपूर येथे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा अशा निर्णयांमुळे मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुरस्काराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

कर्तृत्वाचा गौरव

श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड,  आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन ऑफ द इयर’, महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टुडे सारख्‍या प्रतिष्‍ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व  होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स अवॉर्ड’,  दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना याआधी सन्मानित करण्यात आले आहे.

००००

दीपक चव्हाण/विसंअ