राज्यात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून शास्त्रीय नाव (इलुसिन कोरोकाना) Eleusine coracana असे आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व आणि पश्चिम भागातील जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण
विभाग या कृषी हवामान विभागात डोंगराळ भागात केली जाते. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी नाचणी हे प्रमुख तृणधान्य पिक आहे. राज्यात सन २०२२-२३ मध्ये या पिकाची ६८,६१२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती व त्यापासून ९५,७४५ टन उत्पादन मिळाले. २०२२-२३ मध्ये राज्याची नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता १२.९६ क्विंटल/ हेक्टर एवढी होती.
राज्यातील सर्वाधिक नाचणी पिकाचे क्षेत्र कोल्हापूर (१६५५४ हेक्टर), नाशिक (१५३२६ हेक्टर), पालघर (११६८९ हेक्टर) आणि रत्नागिरी (९६६५ हेक्टर) या जिल्ह्यामध्ये आहे.
नाचणी व इतर पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्व : कमी पक्वता कालावधी असणारी पिके. दुष्काळात तग धरण्याचा गुणधर्म. सुधारित तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिके व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर. भविष्यात मागणी वाढणारी पिके आहेत. या पिकांपासून उत्तम प्रातिचे धान्य व जनावरांसाठी सकस चारा मिळतो.
नाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान:
जमिन व हवामान: नाचणी पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने उप-पर्वतीय विभाग व पश्चिम घाट विभागातील डोंगर उताराच्या वरकस जमिनीवर केली जाते.
पूर्वमशागत: जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचि धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.
सुधारित वाण: फुले नाचणी, 115 ते 120 दिवस पक्वता कालावधी आहे. हेक्टरी 23 ते 25 क्विंटल उत्पादन, हे वाण 80 ते 85 दिवसांत फुलोऱ्यात येतो, उशीरा पक्व होणारा व उंच वाढणारा हा वाण आहे. फुले कासारी, 100 ते 105 दिवस पक्वता कालावधी आहे. हेक्टरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन, हे वाण मध्यम कालावधीत पक्व होणारा 65 ते 70 दिवसात फुलोऱ्यात येतो
बियाणे पेरणी व रोपलागण:
नाचणी पिकाचा ‘खरीप’ हा प्रमुख हंगाम आहे. पारंपरिक पद्धतीने नाचणी पिकाची लागवड मुख्यत्वे रोप लागण पद्धतीने केली जाते. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पारंपरिक पद्धतीने नाचणी पिकाची लागवड भात पिकप्रमाणे रोळगण पद्धतीने केली जाते. रोपलागण पद्धतीने लागवड करायची असल्यास ४ ते ५ किलो
बियाणे/हेक्टर वापरावे. रोपवाटिका करताना गादीवाफे तयार करून त्यावर बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे. रोपांची लागण रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यावर जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात मुख्य शेतात ओळीमध्ये करावी. रोपलागण करताना दोन ओळीमधील अंतर ३०.० से.मी. (एक फूट) व दोन रोपामंधील अंतर १०.० से.मी. ठेवावे.
बिजेप्रक्रिया:
बियाणे पेरणीपूर्वी ‘अझोस्पिरीलम ब्रासिलेंस’ आणि ‘अस्पर्जिलस अवामोरी’ या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास २५ गॅम प्रमाणे करावी.
खत व्यवस्थापन:
पीक लागवड तंत्रज्ञान बाबत संशोधन शिफारशी:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत खालील प्रमाणे संशोधन शिफारस विकसित करण्यात आलेल्या आहेत.
१) खतमात्रा शिफारस:
‘महाराष्ट्राच्या उप-पर्वतीय विभागात नाचणीच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी प्रति हेक्टर ५.० टन शेणखत + नत्र ६० किलो, स्फुरद ३० किलो आणि पालाश ३० किलो या खत मात्रेसोबत जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया (प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम असोस्पिरीलम ब्रासिलेंस आणि अस्पर्जिलस अवामोरी) करण्याची’ शिफारस करण्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मार्फत
करण्यात आलेली आहे.
२) नाचणी पिकामध्ये युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर शिफारस:
‘उप-पर्वतीय विभागातील हलक्या जमिनीत, अधिक उत्पादन व आर्थिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी
नाचणी पिकाची रोप लागण २०:४० से.मी.जोड ओळीत करुन ५.०० टन शेणखत प्रति हेक्टरी +
शिफारशीत खत मात्रेच्या ७५ % मात्रा (४५: २२.५: ० नत्र:स्फुरद:पालाश किलो/हेक्टरी) गोळी (ब्रिकेट)
स्वरुपात रोप लावणीचे वेळी (२० से.मी. च्या जोडओळीत ३५ सेमी अंतरावर व ५ ते ७ से.मी. खोलीवर
२.० ग्रॅमची एक गोळी) देण्याची’ शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी करण्यात आली आहे.
३) आंतरपिके शिफारस:
‘अधिक धान्य उत्पादन निव्वळ नफा मिळविण्यासाठी उप-पर्वतीय विभागातील हलक्या व उथळ
स्वरुपाच्या जमिनीवर नागली/नाचणी पिकामध्ये उडीद किंवा मटकी ८:२ या प्रमाणात आंतरपिक घेण्याची
शिफारस करण्यात आली आहे.
आंतरमशागत:
आंतरमशागत करताना नाचणीमध्ये रोपांची प्रति एकरी योग्य संख्या ठेवण्यासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांच्या आत विरळणी करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात नाचणी पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.
काढणी व मळणी:
नाचणी पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे १०० ते १२० दिवसात पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करवी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी
साठवण करुन ठेवावे.
धान्य उत्पादन:
नाचणी पीक हे पीक लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या सुधारित निविष्ठा व तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे सी 4 वर्गातील पीक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.
०००
(संदर्भ:- डॉ.योगेश बन व डॉ.अशोक पिसाळ, अखिल भारतीय समन्वित नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
श्री.दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी