विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा’; राज्य महिला आयोग आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम

नागपूर, दि.10 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून नागपुरातील वनामती सभागृहात गुरुवार (दि 14) रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी सहभागी होणार असून मेटाचे तज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या इंटरनेट हे दुधारी अस्त्र झाले आहे. त्याचे अनेक फायदे असताना, काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर मुली, महिलांना सायबर माध्यमातून आर्थिक फसवणूक, छळ, ट्रोलिंग, सेक्सटॉर्शन याला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्याकरिता तसेच भविष्यात सायबर सुरक्षित होण्याकरिता याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींनी सायबर सुरक्षित होण्याकरिता घ्यावयाची काळजी, कायद्यातील तरतूदी, यंत्रणांची मदत याबाबत  मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाबाबत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, महाविद्यालयीन मुली सायबर फसवणुकीला बळी पडल्याच्या अनेक तक्रारी माझ्यासमोर राज्यभरातून येत असतात. अशावेळी काय करावे हे मुलींना कळत नाही, कुठे दाद मागावी हे न कळल्याने मुली सहन करत राहतात. अनेकदा आपल्याकडूनच अधिकची माहिती सोशल मीडियात गेल्याने ही फसवणूक होण्याचे प्रकार होत असतात. अशावेळी घ्यावयाची काळजी, चुकीची घटना घडल्यास मदत मिळण्यासाठी असलेल्या यंत्रणा यांची माहिती राज्यातल्या प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचावी यासाठी आयोगाने मेटाच्या सहकार्याने मिशन ई सुरक्षा उपक्रम हाती घेतला आहे.

00000