पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
17

मुंबई, दि. 23: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज पार्ले महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार पराग अळवणी, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, अभिनेत्री सुधा चंद्रन, अभिनेते शैलेश दातार, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ज्योती अळवणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती (Culture), खाद्य संस्कृती (Cusine) आणि कलाकार (Celebrity) यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला.

पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो. येणाऱ्या काळात येथील फॅनेल झोन आणि विमानतळ जवळील झोपडपट्टी पुनवर्सन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

खासदार श्रीमती महाजन म्हणाल्या की, उत्तम आयोजन, उत्तम परीक्षक, उत्तम स्पर्धक यामुळे पार्लेकर यांना हा महोत्सव आपला वाटतो यातच याचे यश आहे.

विलेपार्ले कल्चर सेंटरकडून पार्ले महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाचे 23 वे वर्ष आहे. यावर्षी या महोत्सवादरम्यान वेगवेगळया 32 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये 30 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 30 डिसेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव विलेपार्ले येथील वामन मंगेश दुभाषी मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

पार्ले महोत्सवाचे उद्घाटन प्रास्ताविक आमदार पराग अळवणी यांनी केले. तसेच यावेळी पार्ले महोत्सवासाठी तयार करण्यात आलेले गाणे कार्यक्रमादरम्यान वाजविण्यात आले.

साठ्ये महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी नगर असे नाव देण्यात आले आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here