रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पूर्वी अदा करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. २८ : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने २९४० शेतकऱ्यांची ९ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही.

त्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात कृषी मंत्री श्री. मुंडे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम. एस. सावंत, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळ पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली. यानंतर कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याचे विनंती केली. त्यानुसार उपोषण मागे घेण्यात आले.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/