‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव’ पुरस्काराचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण

सातारा, दि.३०: ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव’ पुरस्काराचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्याचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना प्रदान करण्यात आला.
एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक अनिल पाटील, कायदे सल्लागार दिलावर मुल्ला, सचिव विकास देशमुख आदी उपस्थित होते.
पुरस्कारासाठी ॲड. कुंभकोणी यांची निवड योग्य- दिलीप वळसे पाटील
सहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी शासनाच्या विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये योग्य बाजू मांडल्यामुळे शासनाच्या बाजूने निकाल लागले आहेत. त्यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले.
बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना स्वर्गीय कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनी केली. त्यांनी लावलेल्या वृक्षाचा वटवृक्ष झाला असून यामध्ये इस्माईल साहेब मुल्ला यांचेही मोठे योगदान लाभले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आशुतोष कुंभकोणी यांच्या निवडीने पुरस्काराची उंची वाढली- मंत्री चंद्रकांतदादा पाटील
ॲड. कुंभकोणी यांची इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड होऊन प्रदान होत असल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे,  असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ योजना त्यांच्या शिक्षण संस्थेत सुरू केली. यामुळे मुले स्वाभिमानाने शिक्षण घेऊ लागली. त्याचबरोबर त्यांनी वसतिगृहे निर्माण करून मुलांच्या शिक्षणाबरोबर राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सुमारे चार लाख ५२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संस्था आशियातील सर्वात मोठी संस्था आहे.
ॲड. कुंभकोणी यांच्याकडून पाच लाख रुपयांची देणगी
ॲड. कुंभकोणी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून रयत शिक्षण संस्थेला पाच लाख रुपयांची देणगीही यावेळी दिली.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेमधील अधिकारी कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.