‘पर्यावरणीय शाश्वत परिषद २०२४’ चे ९ रोजी मुंबईत आयोजन  

मुंबई, दि. ५ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी वसुंधरा अभियान, फोनिक्स फाउंडेशन संस्था आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणीय शाश्वत परिषद २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ही परिषद यशवंतराव चव्हाण केंद्र येथे होणार आहे.

चार सत्रांच्या या परिषदेचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गोदरेज उद्योगाचे अध्यक्ष नादीर गोदरेज आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या सत्रामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे पर्यावरण समस्यांवरील उपयांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुसरे सत्र पर्यावरण संरक्षणामध्ये बांबूचे महत्त्व हा विषय असेल. या सत्रास उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. तिसरे सत्र बांबू लागवडीचा कार्यक्रम कशा प्रकारे राबवण्यात येत आहे, या विषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मार्गदर्शन करतील. चौथ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून शाश्वतता याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

या एकदिवसीय परिषदेमध्ये बांबू लागवडीचे महत्त्व, भविष्यातील बांबू लागवडीमुळे पर्यावरणाचे होणारे रक्षण, जैव इंधनासाठी असलेला बांबूचा पर्याय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/