केंद्र शासनाच्या कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

सातारा दि.९( जिमाका):  ग्रामीण भागातील जे पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत, अशा वंचित लाभार्थ्यांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले.
खटाव तालुक्यातील गोरेगाव (वांगी) येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,  धैर्यशील कदम, अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. मिश्रा म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. या यात्रेची सुरुवात 15 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. ही यात्रा ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन तेथील वंचित लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. हे या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

ग्रामस्थांनी पुढे येऊन योजनांचा लाभ घ्यावा

ग्रामीण भागातील एकही पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या गावांमध्येच  शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. स्टॉलला भेट देऊन पात्र
लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. मिश्रा यांनी यावेळी केले.
याप्रसंगी श्री. मिश्रा यांच्याहस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी त्यांनी लाभार्थ्याशी संवादही साधला.
 जिल्हाधिकारी श्री.डुडी म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आतापर्यंत ३ लाख 50 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. पन्नास हजाराहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजना राबविण्यात येत आहे. यामधून ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये मिळणारे उपचार हे आता प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सहाशे शाळा  आदर्श शाळा करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाबरोबर जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध विभागांचे अधिकारी ग्रामीण भागात जाऊन तेथील जनतेला त्यांच्याच गावात केंद्र शासनाचा योजनांचा लाभ देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यात्रेमध्ये पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना बचत गटांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना आदी विविध योजनांच्या लाभासह माहिती देण्याबरोबर अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
या यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यात आल्या. तसेच यावेळी उपस्थितांनी  भारत विकास करण्यासाठी संकल्प शपथ घेतली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000